मुंबई - सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले ( Pradeep Bhide passed away ) आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
21 व्या वर्षी केली होती वृत्तनिवेदनाला सुरुवात - १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात झाली. तर, १९७४ पासून प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदनाला सुरुवात केली. त्या काळात केवळ अर्धा तासच बातम्या सांगितल्या जायच्या. मात्र आपल्या भारदस्त आवाज आणि बातमी देण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे ते जनमाणसांत प्रसिद्ध झाले. वयाच्या २१ व्या वर्षांपासून भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्मय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचं वृत्तनिवेदन केलं आहे.
लहानपणापासूनच झाले होते भाषेचे संस्कार - प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी 'रानडे'मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठ्य पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेत्तर पुस्तकांचे वाचन होतेच. पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठ्या आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता.
...आणि स्वतःचे स्थान निर्माण केले - प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वत:ची एक इमारत होती. तिथे त्यांनी 'प्रदीप भिडे कम्युनिकेशन' या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसविला आणि स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट-लघुपट यावर आपला 'आवाज' ठसविला.