मुंबई - राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून राजकारण तापले असतानाच वेदांत ग्रुप्सने ट्विट (Vedanta Groups tweeted ) करून, भविष्यात राज्यांमध्ये मोठा प्रकल्प निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढील काळात वेदांत ग्रुप राज्यामध्ये गुंतवणूक ( Vedanta Groups tweet about bringing projects ) करणार आहे.
आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला जाब : वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तत्कालीन सरकारच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्प गेल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरले. संबंधित कंपनीने तळेगावच्या जागेची पाहणी करुन हा प्रकल्प महाराष्ट्रमध्येच करणार असल्याचे जाहीर केले. आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर धक्का बसल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला जाब विचारला.
अग्रवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून केला खुलासा : राज्यातील वादावर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून खुलासा केला. दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु असतानाच करार निश्चित केला, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. पुढे अग्रवाल यांनी म्हटले आहे की, नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून चर्चा करून प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारने त्यांना दिलेली ऑफर आणि सवलत त्यांनी मान्य केली. परंतु, भविष्यात महाराष्ट्रातही ते इंटिग्रेटेड प्रकल्प आणण्याचे काम काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय आरोप सुरू - ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ‘वेदान्त’ कंपनीच्या मालकांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचे सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचं जाळे पसरवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने योग्य वाटाघाटी न केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप विरोधकांनी फेटाळला. महाराष्ट्राने गुजरातपेक्षा १२ हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती देऊनही प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.