मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याने कालपासूनच राज्यभरात वातावरण तापले आहे. दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार हे बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयासमोर सरकार विरोधात तसेच शरद पवार यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी चालू असून, कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.
शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळासोबतच पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यातच पवार यांनी स्वत:हूनच ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्तेही संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.
हेही वाचा LIVE: शरद पवार आज 'ईडी' कार्यालयात जाणार; कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू
राष्ट्रवादीची विद्यार्थी संघटना तसेच युवक-युवती संघटना, राष्ट्रवादी महिला संघटना यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.