मुंबई - एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टी कमकुवत झाली आहे. त्यामुळेच आज जळगावात महापौरपदी शिवसेनेचे उमेदवार विराजमान झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. तसेच शिवसेनेचा महापौर झाल्याने भाजपाच्या नगरसेवकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचा चिमटाही यावेळी त्यांनी काढला.
'वाझेंच्या सेवेच्या संदर्भातील निर्णय शासनाचा नाही'
ते पुढे म्हणाले, की भाजपा कमकुवत झाली आहे. आपला महापौरदेखील त्यांना बनवता आला नाही. देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे आरोप करत आहेत, त्यांचा रोख कुठे आहे, हे सर्वांना कळत असून, सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात यावे, यासाठी 2018मध्ये शिवसेनेचे नेते आपल्यावर दबाव टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यात कुठेही तथ्य वाटत नाही. तसेच सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यांना सेवेत घेण्यात यावे, असा कोणताही शासननिर्णय घेतला गेला नाही, असे ते म्हणाले.
'बदलीचा निर्णय प्रशासकीय'
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्णय शासन घेत असते. मात्र काही महत्त्वाच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, असे परमबीर सिंग यांच्या बदलीच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले.