मुंबई - बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे सांगितल्यास महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार शिवसेना करेल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. मात्र संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी हे वक्तव्य अंतर्गत चर्चा करून केले असेल. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सोबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान सोडले असले तरी, ते अद्यापही मुख्यमंत्री आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते मुंबईत बोलत होते.
'...तरी शिवसेनेला फरक पडत नाही' : शिवसेना पक्षाचा इतिहास पाहता आजपर्यंत पक्षातून अनेक नेते बाहेर पडले. मात्र त्याचा कधीही शिवसेनेला फरक पडलेला नाही. त्यामुळे आता हे आमदार बाहेर पडले तरी शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. राज्य सरकार टिकवण्यासाठी संख्याबळाबाबत शिवसेना काय निर्णय घेणार आहे, ते लवकर कळवतील, असे जयंत पाटील यांनी सांगितला आहे.
काय म्हणाले होते राऊत? : बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा, असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे विधान संजय राऊत यांनी केले होते.