मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत. नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. तसेच रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना अटकही झाली. मात्र या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजकीच प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांकडून नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, नारायण राणे यांना महत्त्व देत नसल्याचे ते म्हणाले आहेत. यशवंतराव प्रतिष्ठान येथे शरद पवारांनी नारायण राणेंबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याचे भाजपा समर्थन करत नाही - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन भारतीय जनता पार्टी करत नाही. मात्र मंत्री आणि व्यक्ती म्हणून भारतीय जनता पार्टी नारायण राणे यांच्या मागे उभा असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलीस राज्य सरकारच्या दबावात येऊन काम करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून फडणवीस यांनी केला आहे.