मुंबई - नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी अजूनही मीच मुख्यमंत्री आहे असे वाटते, असे वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असेल, तर त्यांचे अभिनंदन, अशी टीका केली आहे.
'त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही'
पुढे ते म्हणाले, की आपणही राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलो. मात्र आपल्याला मुख्यमंत्री असल्याची आठवण कधीही होत नाही. ही आपल्यामध्ये असलेली कमतरता आहे. "मी पुन्हा येईन" असे वेळोवेळी देवेंद्र फडणीस म्हणाले होते. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. चार वेळा मुख्यमंत्री राहिल्यानंतरही मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर आपण विरोधीपक्ष नेता म्हणून राज्यामध्ये काम केले. हे काम करत असताना राज्यातील जनतेत जाऊन सत्य परिस्थिती काय आहे, हे अनुभवायला मिळाले. या कामाचाही आपण आनंद घेतला, अशी आठवण शरद पवार यांनी करून दिली.
'आघाडी सरकार पाच वर्ष चालणार'
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून सत्तेचा गैरवापर केला जातो. मात्र तपास यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी राज्यातले सरकार पाच वर्ष टिकेल. आता सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे पाच वर्ष सत्ता सोडणार नाही, असा इशारा भाजपाला शरद पवार यांनी दिला.
'हर्षवर्धन पाटील यांच्या तोंडून सत्य बाहेर आले'
भारतीय जनता पार्टीत असल्याने आता आपल्याला शांत झोप लागते, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले. हर्षवर्धन पाटील हे खरे बोलत आहेत. तपास यंत्रणेच्या जाचापासून वाचण्यासाठी अनेक लोकांनी इतर पक्षांतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळेच आता ते सुखाने झोपत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या तोंडून सत्य बाहेर आले असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.