मुंबई - जालना जिल्ह्यातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजता चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
या प्रकरणाला महिना उलटत आला असला, तरी बलात्कारी नराधमांना अजून अटक झालेली नाही. ही मोठी गंभीर बाब असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, यामुळे आम्ही हा मोर्चा काढून सरकारला इशारा देणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात, चार नराधमांनी विषारी ड्रग्ज प्यायला देऊन सामूहिक बलात्कार केला. या पीडितेची महिनाभरापासून सुरु असलेली मृत्यूसोबतची झुंज अखेर काल रात्री संपली. मात्र, या घटनेतील आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे, असा मोर्चा काढला जाणार असल्याचे मलिक म्हणाले.