मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसबीकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित नागरिकांवरही कारवाई केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळीच एनसीबीने वांद्रा परिसरात छापेमारी सुरू केली आहे. आज एनसीबीने चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण-
कॉर्डिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने छापा टाकून आतापर्यंत 18 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या मुलाचाही समावेश आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या 'कॉर्डिया द क्रूझ'वर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले होते.
यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा आठ जणांना न्यायालयात हजर केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.