मुंबई : बॉलिवूडमधील अमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून तपास केला जात आहे. यामध्ये अगोदरच पकडण्यात आलेल्या अनुज केशवाणी या आरोपीची चौकशी केल्यानंतर, आता त्याला अमली पदार्थ पुरवणाऱ्या रिगल महाकाल या तस्करास एनसीबीने अटक केली आहे. यानंतर न्यायालयात सादर केले असता रिगलला दोन दिवसांची एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे.
अंधेरीत छापेमारी..
रिगल महाकाल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील अंधेरी भागात छापेमारी करण्यात आली. तसेच, रिगलकडून उच्च प्रतीचे मलाना क्रीम आणि काही रोकड जप्त करण्यात आली आहे. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी रिगल महाकाल हा बॉलिवूडमधल्या काही मोठ्या सेलिब्रिटींच्या जवळच्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबी महाकालच्या शोधात होती.
सुशांत कनेक्शन..
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून काही महिन्यांपूर्वी अनुज केसवानी या अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, आणि शोविक चक्रवर्ती यांना अनुज अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. अनुज केशवानीकडे येणारे अमली पदार्थ कोण पुरवत होते याचा तपास केला असता रिगलला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रिया चक्रवर्ती व शोवीक चक्रवर्ती यांना न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार का? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी..