मुंबई - गडचिरोली पोलीस दलातील सी-60 कमांडो छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात शुक्रवारी नक्षलवादीविरोधी अभियान राबवत असताना पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. गडचिरोली जिल्ह्यात आहारी तालुक्यात हापुसवर भागात जवानांनी मोठी कारवाई केली. नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना जवानांकडून उद्धवस्त करण्यात आला. 70 जवानांचे 48 तासापर्यंत हे ऑपरेशन चालले. यात एका जवानाच्या पायाला दुखापत झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.
गडचिरोली पोलीस दलातील सी-60 कमांडो छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात शुक्रवारी नक्षलवादीविरोधी अभियान राबवत असताना पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. जवानांच्या मदतीसाठी पोलीस मुख्यालयातून हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
दोन वेळा जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक -
भामरागड तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या कोपर्शीच्या जंगलात सी-60 चे जवान अभियान राबवत होते. घटनास्थळ घनदाट जंगल पर्वतरांगांनी वेढलेले अबुझमाडचा परिसर आहे. रात्रीपासून या भागात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोचे नक्षलवाद्यांविरोधात अभियान सुरू असताना दोन वेळा जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. नक्षलवाद्यांचा हल्ला जवानांनी परतवून लावला. मात्र एक जवान जखमी झाला. जखमी जवानाचे नाव अद्याप कळले नसून जवानांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलीस दलाचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
या परिसरात पोलीस दलाकडून आताही नक्षलविरोधी अभियान आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू असून चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलीस विभागाने वर्तविला आहे.