मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करीत अनेक नावे समोर आणली आहेत. तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपच्यावतीने आरोप सुरू झाले आहेत. मात्र, हे प्रकरण आता शेवटापर्यंत न्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानला फसवून त्याचे अपहरण केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर प्रकरणाला नवीन वळण लागले. या प्रकरणात आतापर्यंत त्यांनी अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रापासून ते त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप नोंदविले आहेत. या प्रकरणात साक्षीदारच आरोपी ठरत आहेत. तर ज्यांच्यावर आरोप आहे ते कसे बळीचे बकरे ठरवले जातात हे सिद्ध करण्याचा खटाटोप सुरू आहे. यातच भाजपच्या मोहित कंबोज यांनी उडी घेतल्याने याला आता आणखी राजकीय वळण लागले आहे. मात्र, मोहित कंबोज हे कसे भ्रष्ट आहेत हे दाखवणारी माहिती मलिक यांनी माध्यमांसमोर उघड करीत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मलिक यांनी घेतली पवारांची भेट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व प्रकरणांची माहिती देण्यासाठी आणि त्यातील अधिकचा तपशील जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना पाचारण केले होते. त्यानुसार नवाब मलिक यांनी आज सकाळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांना माहिती दिली.
हेही वाचा-उडता पंजाब, प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप
प्रकरण शेवटापर्यंत न्या - शरद पवार
प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काय होऊ शकते, कोणती नवी माहिती समोर येऊ शकते, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतले. या सर्व प्रकरणाची तड लावा, प्रकरण लॉजिकल एन्डला (तार्किक शेवटाला) न्या, अशा सल्लावजा सूचना दिल्याची माहिती नवाब मलिक यांनी अनौपचारिकरित्या बोलताना दिली आहे.
हेही वाचा-आर्यन खान प्रकरणाची वस्तुस्थिती तपासात पुढे येईल - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
के. पी गोसावीची सुरक्षेची मागणी - मलिक
क्रूज ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार असलेला के. पी. गोसावी हा सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. मात्र, जर आपल्याला संरक्षणाची आणि जीवाला कोणताही धोका होणार नाही याची हमी दिल्यास आपण सर्व गोष्टी इत्थंभूत सांगायला तयार आहोत, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. एनसीबीने तिघांना का सोडले हे सांगायलाही तयार असल्याचे गोसावी याने पोलिसांना सांगितल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.