मुंबई - कोरोनाच्या सकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. याचवेळी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल 2021मध्ये 8 हजार 259 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या बाबत माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या,कॉर्पोरेट संस्था, उद्योगांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो आहे.
विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
८९ हजार उद्योगांमध्ये नोकरीची संधी -
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ६६८ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. हे उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच विभागाच्या ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मुंबईत एप्रिलमध्ये ३ हजार ९९५ बेरोजगारांना रोजगार -
एप्रिल २०२१मध्ये विभागाकडे १९ हजार ०५५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात ५ हजार ८०९, नाशिक विभागात २ हजार ७५७, पुणे विभागात ४ हजार ९९७, औरंगाबाद विभागात ३ हजार ३७०, अमरावती विभागात १ हजार १४४ तर नागपूर विभागात ९७८ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ८ हजार २५९ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ९९५, नाशिक विभागात १ हजार ३०२, पुणे विभागात १ हजार ७५७, औरंगाबाद विभागात ८६९, अमरावती विभागात ३१४ तर नागपूर विभागात २२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीला लागले आहेत.