मुंबई - काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक दुकानावर मराठी पाटी ( Marathi Boards on Shops ) मोठ्या अक्षरात असली पाहिजे याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, काही विशिष्ट वर्गातली लोक राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत. या वर्गाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Alligation On BJP ) यांनी केला आहे. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक नागरिकांची आणि आस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेला कायदा हा बंधनकारक असल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठी पाट्यांवरून राजकारण तापले -
महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर राज्यात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. मनसेने या निर्णयाची पाठराखण करताना केवळ घोषणा न करता अंमलबजावणी करावी. अन्यथा मनसेला पुन्हा खळखट्याक करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तर मराठीच्या सक्तीला हरकत नाही. पण, इंग्रजीत किंवा अन्य भाषेत पाटी लावण्यास संमती द्यावी, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे.
काय म्हणणं आहे व्यपारी संघटनांचं -
राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे फलक मराठी भाषेत असाव्यात, या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी विरोध दर्शवला ( Traders Union Oppose on Marathi Board ) होता. मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहिताना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. राज्य सरकारचा हा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. तसेच दुकानदारांना व्होट बँक पॉलिटिक्स पासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती करु नका, असे शाह यांनी म्हटले होते.
'हिंदीनंतर मराठी चित्रपटसृष्टीवर दबाव आणण्याचा प्रयत्न' -
एका विशिष्ट विचारधारा आणि राजकीय पक्षाच्या विरोधात सोशल मीडियावर लिहीत असल्यामुळे मराठी अभिनेता किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढण्यात आले. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला, त्याच पद्धतीने आता मराठी चित्रपट सृष्टीवर ही दबावतंत्राचा वापर केला जातो आहे. हे योग्य नसल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. तसेच किरण माने यांच्यावर मालिकेतून काढण्याची कारवाई केलेल्या दूरचित्रवाणी दबावात येऊन त्यांना मालिकेतून काढले आहे. याचा पुन्हा एकदा दूरचित्रवाणीने विचार करावा, असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - Chitra Wagh on CM - मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही सोडवायला अक्कल लागते - वाघ