मुंबई - महाविद्यालय आणि विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या’वतीने (यूजीसी) नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) घेतली जाते. यंदा २ ते १७ मे दरम्यान आयोजित केलेली ही परीक्षा कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ‘एनटीए’मार्फत २० एप्रिलला सायंकाळी वेबसाइटद्वारे याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली.
डिसेंबर २०२० मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टिने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेपूर्वी पंधरा दिवस ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ‘एनटीए’मार्फत आपल्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.nta.ac.in या संकेतस्थळावर माहितीसाठी भेट देण्याचे, तसेच विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांनी या इमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन ‘एनटीए’मार्फत करण्यात आले आहे.