मुंबई - केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार घेऊन केंद्रातील योजनांविषयी जनतेला माहिती दिली. केंद्रातील विविध योजनांची माहिती त्या विभागाच्या मंत्र्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, या उद्देशाने जनता दरबाराची सुरुवात भाजपकडून करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नारायण राणे हे शनिवारी दुपारी जनता दरबारासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित झाले.
महाराष्ट्राच्या विविध भागातून ही माहिती घेण्यासाठी जनता येथे उपस्थित होती. सुरूवातीला केंद्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाविषयी जनतेला प्रेझेंटेशनद्वारे केंद्रीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर नारायण राणे यांनी सुद्धा याबाबत सविस्तर माहिती जनतेला देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. एकीकडे केंद्रीय उद्योग मंत्रालय उद्योगासाठी जनतेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे राज्यातले उद्योगमंत्री जमिनी विकण्याचा उद्योग करत आहेत, असं सांगत नारायण राणे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे व नारायण राणें यांच्यामधील संघर्ष -
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष खरं तर महाराष्ट्रासाठी नवीन नाही. 90 च्या दशकात दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर 2005 मध्ये 39 वर्षे शिवसेनेत काम केल्यानंतर 2005 साली नारायण राणे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केले. त्यानंतरही दोघांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतो. नुकताच भाजपच्या जनआर्शिवाद यात्रा व चिपी विमानतळावरून वाद रंगला होता. त्यामध्ये राणेंना अटकही करण्यात आली होती.
नारायण राणेंच्या 'त्या' थोबाडीत मारण्याच्या वक्तव्याने राज्यात वादंग -
महाड येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना नारायण राणेंनी...मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
केंद्रीय मंत्रीपदाची सुत्रे स्वीकारताच राणेंना अटक -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. शिवसेनेने आक्रमक होत राज्यभरात राणेंविरुद्ध आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
राणेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख -
राणे हे नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतात. शिवसेना पक्षप्रमुख असताना राणे यांच्याविरोधात ते नेहमीच टीका करत होते. काँग्रेसमध्ये असतानाही राणे यांचा रोख केवळ ठाकरे यांच्यावर असायचा. त्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष काढला. तेव्हाही ते सेनेवर टीका करत होते. भाजपमध्ये गेल्यानंतर युती असल्याने त्यांना टीका करताना अडचणी येत होत्या. मात्र, सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्याने भाजपला राणे यांच्या रुपाने कडवा विरोधक मिळाला आहे. राणे व शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील संघर्ष तर सर्वज्ञात आहे.
चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून वाद -
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेपर्यंत पोहोचला. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकले गेल्याने नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. चिपी विमानतळावरून श्रेयवादाचा मुद्दाही चांगलाच गाजला. राणेंनी चिपी विमानतळाचे श्रेय आपले व भाजपचे असल्याचे म्हटले. तर शिवसेनेने याचे श्रेय आपल्याकडे घेतले. उद्घाटनाच्या कार्यक्रमातच राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुगलबंदी रंगली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना काटेरी बाभळीची उपमा दिली.