मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav IT Enquiry ) यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच या चौकशीनंतर त्यांच्या संपत्तीवरदेखील आयकर विभागाने टाच आणली. मात्र, यशवंत जाधव यांच्या डायरीमधून मातोश्रीला ( Yashwant Jadhav Dairy Suspicious Transactions ) दोन कोटी रुपये आणि 50 लाखाचे घड्याळ दिले असल्याची नोंद समोर आली असल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती समोर येणं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Critisized BJP ) यांनी केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले - परमबीर सिंह आणि सचिन वाझे प्रकरणांमध्ये काय झाले, हे सर्वांना माहित आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या चौकशी करत आहेत. त्याबाबत संशय निर्माण होतो आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी दादर येथील प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
'सोमैयांनी लोकांचे मनोरंजन थांबवावे' - परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा घेऊन तोडण्यासाठी किरीट सोमैया दापोलीला निघाले. किरीट सोमैया बेछूट कोणावरही आरोप करतात. याआधीही त्यांनी कृपाशंकर सिंह, नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, या नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. या नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्यानंतर ते गंगा नहाले का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तसेच किरीट सोमैया आणि भारतीय जनता पक्षाने आता असे लोकांचे मनोरंजन थांबवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
'हे सरकार पाच वर्ष टिकणार' - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एक सोबत होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका होणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा पाहिला मिळते आहे. मात्र, महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका लागणार नाहीत. महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास नाना पाटील यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या मताशी सहमत - राजकारण चुलीत जावो लोकांच्या हितासाठी काम झाली पाहिजे, असे वक्तव्य देवेंद्र फडणीस यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आपण सहमत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. केवळ जनतेच्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन - पाच राज्यांच्या निवडणुका संपताच, केंद्र सरकारने राज्याच्या जनतेला महागाईच्या खाईत लोटले. त्यामुळे महागाईच्या विरोधात 31 मार्चपासून काँग्रेस देशभर आंदोलन करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. "गरज सरो आणि वैद्य मरो" अशी प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची असल्याचा टोला नाना पटोले यांनी यावेळी लगावला. तसेच केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे केले आहेत. त्या कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन 28 आणि 29 मार्चला होणार आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेदेखील पाठिंबा दर्शवला असून 28 व 29 मार्च केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
हेही वाचा - Sunday Street Mumbai : मुंबईकरांचा 'संडे स्ट्रीट'ला उत्स्फूर्त प्रतिसाद, रस्त्यावर उभारल टेनिस कोर्ट