मुंबई - 'जेएनयू'मधील मारहाणी विरोधात 'गेटवे ऑफ इंडिया'वर गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बरेच नेते-अभिनेते भेट देत आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांना याबाबत विचारले असता, विद्यार्थ्यी शिक्षण घेण्यासाठी विद्यालयांमध्ये जातात, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाटेकर यांना आपली प्रतिक्रिया विचारली असता, हा हल्ला कोणी केला याची चौकशी अगोदर होणे गरजेचे आहे. ही चौकशी झाल्याशिवाय मी यावर बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यानी हे विसरू नये, की आपले आई-वडील कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवत आहेत. केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये आले असता, विद्यार्थ्यांविरूद्धच पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली जाते, राजकीय नेते मात्र नामानिराळे राहतात. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवरच होतो, त्यांना सोडवण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही. विद्यार्थ्यांना या सर्वाची झळ बसल्यावर आपोआप या गोष्टी कळतील. मात्र, त्यांनी आधीच सावध रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, या भ्याड हल्ल्याची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.
हेही वाचा : 'फ्री काश्मिर' बाबत समोर आले स्पष्टीकरण; हा फलक काश्मीरमुक्तीसाठी नव्हे, तर..