मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपट गृहे, नाट्यगृहे, बंदिस्त जागा, मोकळी मैदाने यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास राज्य सरकारच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी -
राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून कोरोनाची दुसरी लाटही आटोक्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मंदिर, शाळा, महाविद्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन मधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर आता चित्रपट गृहे, नाट्यगृहे, बंदिस्त जागा, मोकळी मैदाने यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात सतत धुणे या कोरोना नियमांची अंमलबजावणी तसेच राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अन्यथा साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे पालिकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करा -
राज्य सरकारकडून बनवण्यात आलेल्या नियमावली नुसार चित्रपट गृहे, नाट्यगृहे, बंदिस्त जागा, मोकळी मैदाने यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेक्षक आत जाताना आणि बाहेर पडताना गर्दीवर नियंत्रण ठेवावे. आत जाताना थर्मल गणने शरीराचे तापमान तपासण्यात यावे. हात स्वच्छ करण्यासाठी जागोजागी सॅनिटायझर ठेवावे. चित्रपट गृहे, नाट्यगृहे, बंदिस्त जागा, मोकळी मैदान येथे कार्यक्रम आयोजित करताना स्वच्छता ठेवावी. कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे लसीकरण करावे आदी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे म्हटले आहे.
चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश -
कोरोनाचा प्रसार कमी झाला असल्याने निर्बंधांमध्ये शिथिकता देण्यात आली आहे. शॉपिग मॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरविण्यात आले आहेत. तर मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
हेही वाचा - "माफ करा पुन्हा चूक करणार नाही", म्हणत अमिताभ यांनी मागितली माफी