मुंबई - मुंबई महापालिकेकडून ज्या शाळांना अनुदान देण्यात येते, त्या शाळेच्या भिंतीवर अथवा दर्शनीय ठिकाणी "मुंबई महापालिका अनुदानित शाळा" असा फलक लावला जात नाही. असा फलक न लावणाऱ्या शाळांना यापुढे अनुदान देण्यात येणार नाही, असा इशारा शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी दिला आहे.
पालिका अनुदानित फलक लावणे बंधनकारक
सोमवारी शिक्षण समितीची बैठक पालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या अनुदानित शाळांना पालिकेतर्फे अनुदान देण्यात येते, त्या शाळांच्या बाहेर 'बृहन्मुंबई महापालिका अनुदानीत शाळा' असे फलक लावले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावर बोलताना संध्या दोशी म्हणाल्या की, ज्या शाळेंना महापालिकेकडून अनुदान भेटत आहे, त्या सर्व शाळांनी "मुंबई महापालिका अनुदानित शाळा" असा फलक लावने बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल.
लोकप्रतिनिधींचा अवमान
काही कॉन्व्हेंट शाळांना लोकप्रतिनिधी एखाद्या सामान्य विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत एखादे पत्र देऊन विनंती करतात, तर त्या शाळा त्यास न जुमानता पत्र फाडून टाकतात. हा एकप्रकारे लोकप्रतिनिधींचा अवमान आहे. असेही यावेळी संध्या दोशी यांनी म्हटले आहे. तसेच यापूढे अनुदान मिळणाऱ्या शाळांनी पाटी न लावल्यास अनुदान बंद करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.