मुंबई : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून मॅनहोल उघडे राहिल्याने दुर्घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी ३ हजार ६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्यात आल्या आहेत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढून टाकू नयेत, त्यातून दुर्घटना घडू शकतात. तसे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
मॅनहोलवर संरक्षक जाळी : पावसाळापूर्व कामे करताना पालिकेकडून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. यंदाही मुंबई व उपनगरांतील मॅनहोलची तपासणी करून दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ३ हजार ६७९ मॅनहोलवर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात रस्ते तुडुंब भरू नये म्हणून उपाययोजना : जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करून मॅनहोलची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये मुंबई शहर विभागात २ हजार ९४५, पूर्व उपनगरात २९३, तर पश्चिम उपनगरात ४४१ मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
झाकणे काढल्यास कारवाई : मुंबई महानगरात जोरदार पावसाच्यावेळी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्याची सूचना देणारे फलकदेखील लावलेले असतात. मात्र, कोणत्याही स्थितीत पाणी साचलेल्या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढून टाकू नयेत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
हेही वाचा : BMC preparation before Monsoon : मुंबईत पावसाळयात एनडीआरएफसह सैन्यदलाच्या तुकड्याही असणार सज्ज!