मुंबई - आशियातील खंडातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे ( Mumbai Thane First Train ) दरम्यान आजच्या दिवशी ( First Train In India ) अर्थात 16 एप्रिल 1853 रोजी धावली. आज या पहिल्या ट्रेनला 169 वर्ष पूर्ण झाले आहे. मुंबई ते ठाणे दरम्यान धावणारी पहिली ट्रेन भारतीय रेल्वेत खऱ्या अर्थाने संस्कृती आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार आहे.
अशी धावली पहिली झुकझुक गाडी - ब्रिटिशांना भारतात कार्यक्षम रित्या प्रशासन करता यावेत. यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा 1832 साली मांडण्यात आलेला होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारने "ग्रेट इंडियन पेनिन्सुल" (जी.आय.पी) ( Great Indian Peninsula ) या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने 56 किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याची कंत्राट दिले होते. ब्रिटिश सरकारने 14 नोव्हेंबर 1849 रोजी जेम्स जॉन बर्कले या अवघ्या 30 वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियर वर रेल्वे प्रत्यक्षात साकरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन ऑक्टोंबर 1851 मध्ये करण्यात आलेले होते. ही पहिली 16 एप्रिल 1853 ला दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी मुंबई ते ठाणे दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.
21 तोफांची सलामी - रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास खूपच रंजक आहे. "ग्रेट इंडियन पेनिन्सुल" (जी.आय.पी) ही रेल्वे कंपनी नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली आहे. जेव्हा पहिली रेल्वेगाडी धावली तेव्हा या गाडीला 14 डबे लावण्यात आले होते. या 14 डब्यांसाठी सिंधू, सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय इंजिन जोडण्यात आलेली होते. पहिल्या गाडीच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी 400 नागरिकांना निमंत्रण देण्यात आले होते. या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या समावेश होता. मुंबई दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या मुहूर्तावर पहिली गाडी सोडण्यात आली होती. त्यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.
जगातील दुसरे आश्चर्यकारक स्थानक - भारतीय रेल्वेच्या आणि जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे एक वेगळे महत्व असून या स्थानकावरून आशिया खंडातील पहिली रेल्वे गाडी धावली होती. आज संपूर्ण जगाच्या पाठीवर दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून गणले जाते. आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी ओळख असणाऱ्या सीएसएमटी इमारतीला 132 वर्ष झाले आहेत. मे 1878 मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम्स स्टीव्हन यांनी जीआयपी रेल्वे कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली. आणि 20 में 1888 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्यावेळी इमारत बांधण्यासाठी 16.14 लाख रुपयांचा खर्च आलेला होता. स्वातंत्र्य पूर्वकाळात दर्शनीय भागात असलेल्या घडयाला खाली राणीचा पुतळा होता. पुढे 1950 आली तो हटवण्यात आला.
मध्य रेल्वे 4183 मार्ग किमीवर पसरलेले - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भारतीय रेल्वे आणि संपूर्ण रेल्वे समूहाची शान आहे. सन 1900 मध्ये, इंडियन मिडलँड रेल्वे कंपनी मध्य रेल्वेच्या पूर्ववर्ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये विलीन झाली आणि तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली. ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूर ते दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आल्या. अशाप्रकारे, मुंबईद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. G.I.P चे रेल्वेमार्ग १६०० मैल ( 2575 किमी) होते. नोव्हेंबर 1951 मध्ये निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे 5 विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4183 मार्ग किमीवर पसरलेले आहे.