मुंबई - मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा ताज हॉटेलने रस्ते आणि पदपथ व्यापले आहेत. त्याबदल्यात पालिकेने ताजला ८ कोटी ५० लाख रुपयांचे सूट देण्याचा प्रस्ताव आज पालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधारी शिवसेनेने कोणालाही बोलू ना देता मंजूर केला. याप्रकरणी लोकआयुक्तांकडे दाद मागणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली. दरम्यान, ताजला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने सुरक्षेसाठी त्यांनी पदपथ व्यापले आहेत. म्हणून त्यांना शुल्कातून सूट देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
विरोधकांचा सभात्याग
मुंबईतील २६/११च्या अतिरेकी हल्ल्यानंतर ताज हॉटेलने गेटवे ऑफ इंडियासमोरील काही रस्ते आणि फुटपाथ सुरक्षेच्या कारणामुळे पादचाऱ्यांसाठी बंद केले आहेत. त्यासाठी व्यापलेल्या जागेच्या धोरणानुसार ताज व्यवस्थापनाला फुटपाथसाठीचे ८ कोटी ८५ लाख रुपये शुल्क भरण्यास सांगितले होते. मात्र ते महापालिकेने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्यापलेल्या रस्त्याच्या शुल्कातही ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्ताव ९ डिसेंबरच्या स्थायी समितीत परत पाठवण्यात आला होता. आज या प्रस्तावावर कोणालाही बोलू न देता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. स्थायी समिती अध्यक्षांनी चर्चा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने सभात्याग केला.
लोकशाही प्रक्रिया संपुष्टात
ताजला रस्ते वापरण्यासाठी जे शुल्क आकारले जाणार आहे, त्यात ५० टक्के सूट देण्याचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. यावेळी आम्हाला बोलू दिले नाही. कोविड काळात पाणी पट्टीत स्थगिती द्यावी, मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे केली. पाणीपट्टी २०० टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आला. त्यालाही आम्ही विरोध केला. मुंबईकर कोव्हिडमध्ये भरडला गेला आहे. त्याला सवलत दिली जात नाही, मात्र टाटा आणि बिर्लाला सवलत दिली जाते. अशाप्रकारे काम करून स्थायी समितीमधील लोकशाहीची प्रक्रिया संपुष्ठात आणण्यासारखे आहे असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.
लोकायुक्तांकडे दाद मागणार
२०१८मध्ये पॉलिसी बनवा आणि नंतर निर्णय घ्या, असे आदेश लोकआयुक्तांनी दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पालिकेतील सत्ताधारी होर्डिंग्सवाल्यांना, हॉटेलवाल्याना सूट देतात. सामान्य मुंबईकरांना सूट देत नाहीत. यावरून पालिकेतील सत्ताधारी श्रीमंतांसाठी काम करत असल्याचा आरोप राजा यांनी केला. लोकआयुक्तांनी ताज प्रकरणी दिलेल्या आदेशाचे पालिका प्रशासनाने उल्लंघन केले आहे. ही बाब लोकआयुक्तांच्या निदर्शनास आणण्यासाठी आपण लोकआयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'जबाबदारी विरोधक घेणार का?'
ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. सुरक्षायंत्रणा आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत ताज हॉटेलने बॅरिकेटिंग केले आहे. ताज हॉटेल ही एक ऐतिहासिक वस्तू आहे. त्याची जपवणूक करण्याची गरज आहे. ताजने याआधी पैसे भरले आहेत. त्यानंतरच्या कालावधीतील काही रक्कम सूट दिली जाणार आहे. इतर ऐतिहसिक अशा वास्तूंसाठीही बॅरिकेटिंग केले जाते. भविष्यात ताजवर पुन्हा हल्ला झाला, त्याची जबाबदारी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष घेणार आहे का, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. केवळ विरोधाला विरोध केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जाधव यांनी दिला.