मुंबई - मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामध्येच घाटकोपर असल्फा येथील एक 32 वर्षीय महिला शनिवारी वाहून गेली. पालिकेने नाल्यांमध्ये लावलेल्या लोखंडी जाळ्यांचे अडथळे पार करत या महिलेच्या मृतदेहाने तब्बल 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास केला आहे. घाटकोपर एका बाजूला, आणि हाजीअली दुसऱ्या असे असताना मृतदेहाने केलेला हा प्रवास पाहता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेची मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून सध्या चौकशी केली जात आहे. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
मुंबईत शनिवारी (3 ऑक्टोबर) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. यावेळी सखल भागात पाणी साचले होते. या दरम्यान घाटकोपरच्या असल्फा भागात शीतल भानुशाली नावाच्या 32 वर्षीय महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. मात्र पर्जन्य जलवाहिनीतून म्हणजेच गटारात पडून त्या वाहून गेल्या. शनिवारपासून या महिलेचा शोध घेतला जात असताना, रविवारी रात्री 11.15 च्या सुमारास हाजी अली पोलीस चौकीच्या मागील बाजूस समुद्रात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
असल्फा येथे राहणारी महिला याच विभागात उघड्या गटारात वाहून गेली, तरी तिचा मृतदेह जवळपासच्या मोठ्या नाल्यात मिळणे अपेक्षित होते. असल्फाच्या पुढे साकीनाका इथेही नाल्यात लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील पर्जन्य जलवाहिनी पुढे मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे त्या ठिकाणीही मृतदेह मिळणे अपेक्षित होते. मात्र, यांपैकी कोणत्याच ठिकाणी आढळून न येत, या मृतदेहाने लोखंडी जाळ्यांचे अडथळे पार करत 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास केला आहे. यामुळे हाजीअली पर्यंत हा मृतदेह पोहचलाच कसा? ही महिला उघड्या गटारात नेमकी कुठे पडली? याची चौकशी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी डॉ. अमरापूरकर या व्यक्तीचाही अशाच प्रकारे मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने अनेक मॅनहोलमध्ये जाळ्या बसवल्या आहेत. तसेच नाल्यांमधील कचरा खाडी आणि समुद्रात जाऊ नये म्हणून ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले आहेत. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून याची चौकशी केली जात आहे. पालिकेच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात येईल त्यात कोणाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत! अल्पवयीन मुलीवर हल्ला करत तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल