मुंबई- कोरोना विषाणूचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला असून 20 मार्च ते 10 एप्रिल या दरम्यान शहरात विविध ठिकाणी2470 गुन्हे दाखल केले असून याव्दारे तब्बल 4617 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणार्या 235 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 896 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 3485 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 188 नुसार पोलिसांनी तब्बल 265 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापना सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
दक्षिण मुंबईत एकूण 20 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, मध्य मुंबई 86, पूर्व मुंबईत 86 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबई 63 व उत्तर मुंबई 45 अशी कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.