मुंबई - मुंबई शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील सवयीचे आरोपी, दरोडेखोर, फसवणूक करणारे, अपहरण करणारे, खंडणी मागणारे, अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीची हमी घेण्यासाठी आता 25 हजारापासून ते 50 लाख रुपया पर्यंतचा बॉण्ड लिहून घेण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या खास अभियानातून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमधील 3043 गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे.
मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी नवीन अभियानयाअंतर्गत 3043 नामचीन गुन्हेगारांचा लेखाजोखा मुंबई पोलिसांकडे तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांच्यावर दाखल गुन्हे व त्यांनी केलेला शेवटचा गुन्हा, त्यांच्या दाखल प्रकरणातील शिक्षा किंवा निर्दोष सुटलेली प्रकरणे यासंदर्भातला आढावा घेऊन अशा आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा बाँड लिहून घेतला जात आहे. या अगोदर केवळ पाच हजाराचा बॉण्ड लिहून घेतला जात होता. मात्र, या गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून आता यात बदल करण्यात आला आहे.
सीआरपीसी कलम 110, 102, 108, 107 त्यानुसार हा बॉण्ड लिहून घेतला जात असून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी प्रत्येक पोलीस ठाण्यातील 25 नामचीन गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे.
बॉण्डची किंमत कशी ठरणार -
गुन्हेगारांचा पोलिसांकडून तपशील घेतला जात आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन त्यांचे वार्षिक उत्पन्न व त्यांनी दाखल केलेला इन्कम टॅक्स भरणा याचा विचार करून या गुन्हेगारांकडून सदरचा बॉण्ड हा लिहून घेतला जात आहे. नुकत्याच माहीम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका गुन्हेगारांकडून 15 लाख रुपयांचा चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड पोलिसांनी लिहून घेतला होता. मात्र, यानंतरही आरोपीकडून एक मोठा गुन्हा घडल्यामुळे हे 15 लाख रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले. अशा प्रकारच्या कारवाईमुळे आरोपींवर वचक बसवून मुंबईत गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - सिक्किममध्ये होणार फिल्म सिटी? उच्चस्तरीय बैठकीत चर्चा