मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त आणि राज्य सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. सोमवारी या मागण्यांसाठी वडाळा डेपोबाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
वेतन करारासह, बोनस, बेस्टच्या अर्थसंकल्पाचे पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण आदी मागण्याबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यानंतरही बेस्ट प्रशासनाला एक संधी म्हणून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर मात्र कामगारांनी दिलेल्या संपाच्या कौलाचा वापर करावा लागेल, असे सांगत बेस्ट कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी संपाचा इशारा दिला आहे.
वेतन करार, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्या बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त, राज्य सरकार दरबारी प्रलंबित आहेत. संप करायचा का? याबाबत २३ ऑगस्टला विविध बस आगाराबाहेर कामगारांनी मतदान केले. मतदानात १७ हजार ९२५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संपाच्या बाजूने मतदान केले. तर ३६८ कर्मचाऱ्यांनी संप नको अशी भूमिका मतदानातून मांडली. ऑनलाईन मतदानात १ हजार ५८६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संपाच्या बाजुने कौल दिला. तर ९८ कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असे मत नोंदवले. कामगारांमध्ये रोष असून यावेळी बेस्ट प्रशासन, पालिका व राज्य सरकारने मागण्या मान्य करण्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही, तर मात्र सोमवारी धरणे आंदोलनात पुढील भूमिका स्पष्ट करू असे राव यांनी सांगितले होते. त्यानुसार आजपासून बेस्टच्या वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
विविध मागण्यांसाठी 'बेस्ट' कर्मचारी करणार धरणे आंदोलन; सोमवारपासून प्रारंभ