मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईत येत्या सहा ते आठ आठवड्यात १० हजार ते २१ हजार रुग्ण दिवसाला आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पालिका सज्ज झाली असून खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आणि १०० टक्के आयसीयू खाटा ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी मुंबईतील २४ विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला -
मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६७४ रुग्ण आढळून आले असून ११ हजार ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ लाख ४० हजार ९३५ रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या ४५ हजार १४० सक्रिय रुग्ण आहेत. गेले दोन दिवस सहा हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. २८ मार्चला ६९२३ रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असून रुग्ण दुपट्टीचा कालावधी ५८ दिवसांवर आला आहे.
हेही वाचा - संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया
असे होणार खाटांचे वाटप -
मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागल्याने रुग्णांवर उपचार करता यावेत, रुग्णालयात खाटा उपलब्ध करता याव्यात म्हणून पालिका आयुक्तांनी सर्व खासगी आणि नर्सिंग होम मधील ८० टक्के खाटा आणि १०० टक्के आयसीयू खाटा सर्व २४ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. खाटांचे नियोजन करण्याचे काम २४ विभागातील वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून करावे. वॉर्ड वॉर रुममध्ये कामाचे नियोजन करता यावे म्हणून शिक्षकांची आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णांना खाटांचे वाटप वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून डॉक्टरांनी करावे. त्यासाठी सर्वात आधी विभागातील रुग्णालय, नर्सिंग होममध्ये रुग्णांना खाटा उपलब्ध करून घ्याव्यात. त्या खाटा भरल्यावर ईएसआयएस रुग्णालय, खासगी रुग्णालय, जंबो कोविड सेंटर, राज्य सरकारी रुग्णालय व सर्वात शेवटी पालिकेच्या रुग्णालयातील खाटांचे वाटप करावे असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
खाटा वाटप करतानाच्या सूचना -
१ - सर्वात आधी विभागातील रुग्णालयातील, नर्सिंग होममधील खाटा आणि आयसीयू खाटा आधी देण्याचा प्रयत्न करावा.
२ - विभागातील रुग्णालय आणि नर्सिंग होममधील खाटा भरल्यावर केंद्र सरकारच्या ईएसआयएस रुग्णालयातही खाटा देण्यात याव्यात
३ - त्यानंतर खासगी रुग्णालयातील खाटा आणि आयसीयू खाटांचे वाटप करावे
४ - जंबो कोविड सेंटरमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना खाटांचे वाटप करावे
५ - सरकारी रुग्णालयातील खाटांचे वाटप करावे
६ - सर्वात शेवटी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील खाटांचे वाटप करावे..
हेही वाचा - 'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'