मुंबई : ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखल केलेला राजीनामा मंजूर न केल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) दाद मागण्याकरिता धाव घेण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई महानगरपालिकेला ( Mumbai Municipal Corporation ) उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केल्याचे पत्र देण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सविस्तर निकाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की आमच्या मते, या प्रकरणात वस्तुस्थिती आणि परिस्थितीत आम्ही हस्तक्षेप न केल्यास ते न्यायाचे अपयश असेल म्हणून याचिकाकर्त्याने मागितल्याप्रमाणे निर्देश जारी केले असे म्हटले आहे.
सविस्तर ऑर्डर मधील प्रमुख मुद्दे
- याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, राजीनामा 3 ऑक्टोबर 2022 रोजी रीतसर सादर करण्यात आला होता.
- एक महिन्याची मुदत संपण्यापूर्वी कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास कर्मचाऱ्याला एक महिन्याचा पगार (नोटिस पे) तिजोरीत भरावा लागतो.
- याचिकाकर्त्यांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही किंवा कोणतीही थकबाकी नाही, असे याचिकाकर्त्याने ठामपणे सांगितले आहे आणि याचिकाकर्त्याने एक महिन्याचे वेतन आधीच जमा केले आहे.
- अशा परिस्थितीत राजीनामा न स्वीकारणे हे मनमानी आणि विकृत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- त्याचबरोबर याचिककर्त्याचे वकिलांनी असा मुद्दा मांडला की निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी नियमितपणे परवानग्या दिल्या आहेत.
- याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, याचिकाकर्त्याला मुद्दाम निवडणूक लढवण्यापासून रोखण्याच्या एकमेव उद्देशाने प्रतिवादी म्हणजे महापालिका आयुक्त आपले तांत्रिक युक्तिवाद मांडत आहेत, जे अपेक्षित नाही.
- त्यानुसार, आम्ही प्रतिवादी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्याला 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत याचिकाकर्त्याने दिलेला राजीनामा स्वीकारण्याचे पत्र जारी करण्याचे निर्देश देत आहोत.
- महानगरपालिकेच्या वकिलांच्या उपस्थितीत सदर आदेश दिलेला असल्याने, संपूर्ण आदेशाची वाट न पाहता राजीनामा मंजूर करावा.
कायदेशीर बाबींची केली होती चाचपणी : ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो पालिकेने स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्या अर्ज भरू शकतात की नाही याबाबत पक्षाकडून कायदेशीरबाबी तपासल्या जात आहेत. त्यानंतर याचा निर्णय पक्ष घेईल. लटके यांचा राजीनामा मंजूर करू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव पालिकेवर असू शकतो अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी माहपौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
पालिका नियम काय सांगतो : किमान सेवेची २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो. परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहीत धरले जाते.