मुंबई - राज्यात ९ मार्चला पहिला रुग्ण सापडला; आणि यानंतर बाधितांची सुरू झालेली श्रृंखला अद्याप थांबलेली नाही. मुंबई आणि पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. महामारीच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व ठिकाणी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, राज्यभरात दररोज ५००हून अधिक रुग्णांची भर पडत आहे.
24 एप्रिलपर्यंत राज्यात सहा हजार 817 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 301 व्यक्तींचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 960 व्यक्तींवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 4447 रुग्ण आढळले असून 178 जणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल पुण्यात 1020 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 72 जणांचा मृत्यू झालाय.
राज्यभरात एक लाख 19 हजार 161 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आठ हजार 814 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
वयोगटानुसार मृत्यूदर
सध्या राज्यातील आजाराचा मृत्यूदर 4.4 टक्के आहे. 269 मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केल्यास 50 वर्षाखाली कमी रुग्णांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेषतः 21 ते 30 वर्ष वयोगटातील मृत्यूदर 0.64% आहे. तर यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढल्याचे चित्र आहे. 61 ते 70 या वयोगटात सर्वाधिक मृत्यूदर आहे. त्याचे प्रमाण 17.78 टक्के आहे. यामुळे 50 वर्षावरील तसेच अन्य आजार असणा-या रुग्णांमध्ये कोरोनामुळे आणखी गुंतागुंत होण्याची शक्यता आहे.
प्रयोगशाळा तपासण्या
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 2089 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 6 हजार 817 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.