मुंबई - गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटीच्या बसेस शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे, परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मंगळवारपासून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. गुरुवारीही १ हजार १३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. आतापर्यंत २ हजार ५३ एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
हेही वाचा - Prabhakar Sail : प्रभाकर साईलची एनसीबीकडून तीन तास चौकशी
राज्यभरात २ हजार ५३ कर्मचाऱ्यांचे निलंबन
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा कामगार संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली. एसटी महामंडळाकडून मंगळवारी ३७६ तर, बुधावरी ५४२ आणि आज १ हजार १३५ असे आतापर्यंत २ हजार ५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचा विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या संपाला आज १५ वा दिवस उजाडलेला आहे. कामगारांचा संप आता चांगलाच चिघळला असून आज राज्यातील २५० आगारांपैकी २५० आगार बंद होते. एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे संपात सहभागी होणारे कर्मचारी चांगलेच आक्रम झाले असून आज राज्यभरातील आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
आज १ हजार १३५ कर्मचारी निलंबित
आज एसटी महामंडळाने राज्यातील १२२ एसटी आगारातील ११३५ कर्मचारी निलंबित केले, ज्यामध्ये नागपूर विभागातील ३०, वर्धा विभागातील २, भंडारा विभागातील १८, चंद्रपूर विभागातील ५, अकोला विभागातील ६६, बुलडाणा विभागातील ४०, यवतमाळ विभागातील ५६, अमरावती विभागातील ५०, औरंगाबाद विभागातील १५, बीड विभागातील ६७, उस्मानाबाद विभागातील २२, परभणी विभागातील ५, नाशिक विभागातील ५४, अहमदनगर विभागातील २०, जळगाव विभागातील ५१, पुणे विभागातील १३८, सांगली विभागातील ४४, सातारा विभागातील २, सोलापूर विभागातील ५, रायगड विभागातील ६३, ठाणे विभागातील ७३, गडचिरोली विभागातील ३४ आणि मुंबई विभागातील ६४, असे राज्यभरातील १ हजार १३५ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - ST Workers Strike : आंदोलन हिंसक झाले तर सरकार जबाबदार, एसटीचा खासगीकरणाचा डाव - दरेकर