मुंबई - राज्यातील कोरोनाच्या स्थिती भयावह झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 376 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनही कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्यावर भर देत आहे. आज दिवसभरातील कोरोनाच्या परिस्थितीचा थोडक्यात आढावा...
हेही वाचा - कोरोनाच्या चाचणीकरता जॉन्सन अँड जॉन्सनची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू
ढकलली पुढे एमपीएससी
दिवसभरातील ही महत्त्वाची घडामोड आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांतून यास विरोध होत असला तरी कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. दुसरीकडे १०वी, आणि १२वीच्या परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
'एकवटतो तेव्हा जिंकतो'
कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्राचा अग्रक्रम आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालक आणि तज्ज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
हेही वाचा - मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईतील 'या' रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा बंद
तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद
सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या बारामती तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहीम आज लसीअभावी बंद पडली. तर इंदापूर तालुक्यात कोरोना लसीअभावी लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बीकेसी कोविड सेंटरमधील लसीकरण केंद्र बंद झाले आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी कोरोना लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे. बारामतीमध्ये आतापर्यंत 53 हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. अशीच परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.
रुग्णसंख्येत वाढ
राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. 'ब्रेक द चेन'अंतर्गत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र एकूणच आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत आहे. सोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या पाहता सर्वच रुग्णांना सुविधा पुरविताना रुग्णालय प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
लोकल बंद होण्याची शक्यता
राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची आकडेवारी वाढत असून लोकलमधील गर्दी हेदेखील कोरोनारुग्ण संख्यावाढीचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. यावरुन राज्य सरकार पुन्हा लोकांवर निर्बंध घालावे का, याचा विचार करत आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहेत.