सिंधुदुर्ग - खासदार नारायण राणे यांनी शिवेसनेवर केलेल्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे धारीष्ठ करू नये, असा इशारा शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. ज्याचे राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेले, त्या नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर किंवा सरकारवर बोलू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार राऊत यांनी केला आहे.
उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या आहेत. मग त्या वन खात्याच्या असतील किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणे आजसुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्यच लुबाडणूकीत गेले. त्यांनी अनिल परब यांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही, असे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत म्हणाले.
हेही वाचा-उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ
पुढे खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याच निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत. हे महत्त्वाचे आहे. जिथे शिस्तीने आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचे पूर्णपणे पालन केले जात असलेले महाराष्ट्र हे एकमेवर राज्य आहे. मात्र, ज्यांना कावीळ झालेली त्यांना सगळेच पिवळे दिसते. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत. त्यांना खुर्ची मिळत नाही , म्हणून वेडापीसा झालेला हा माणूस आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने बरळत आहेत. त्यांना जे बरळायचे असेल, ते बरळू दे.
हेही वाचा-खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार
नारायण राणे नेमके काय म्हणाले होते ?
लॉकडाऊन संदर्भात बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचे जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करायचं काम घटनेत राज्य सरकारला दिले आहे. जरा राज्यघटना वाचा, नुसते मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा गंभीर आरोप भाजप खासदार राणे यांनी केला.