मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग असलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाखांवर पोहचली आहे.
काल एका दिवसात सर्वात जास्त म्हणजेच ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण वाढीचा सरासरी दर १ टक्क्यापेक्षा कमी तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी सत्तरी पार झाला असून १८ हजारापेक्षा कमी सक्रिय रुग्णांची संख्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोविड १९ संसर्गाच्या सुरुवातीपासून अधिकाधिक चाचण्या ही बाब केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवण्यावर भर दिला आहे. आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. प्रारंभी ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. नंतर १ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. म्हणजेच १ लाख ते २ लाख हा टप्पा गाठण्यासाठी २५ दिवस लागले. त्यानंतर दिनांक २४ जून २०२० रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला. तर दिनांक १४ जुलै २०२० रोजी ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला. आज ५ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून ४ लाख ते ५ लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या १५ दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे. यातून सरासरी चाचण्यांचा वेग वाढला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
चाचण्या वाढल्या -
विशेष म्हणजे काल २८ जुलै रोजी २४ तासांमध्ये तब्बल ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एका दिवसांत करण्यात आलेल्या चाचण्यांचा हा उच्चांक आहे. तत्पूर्वी २७ जुलै २०२० रोजीच्या २४ तासांमध्ये देखील ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या दैनंदिन सरासरी चाचण्यांच्या तुलनेत हा वेग आता दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे.
रुग्ण दरवाढ 1 टक्क्यांच्या खाली -
मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९७ टक्के इतका नोंदवला गेला असून १ टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांपैकी १८ विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे.
रुग्ण दुप्पट्टीचा कालावधी ७२ दिवस -
मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता ७२ दिवसांचा झाला आहे. यातही विशेष म्हणजे, मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांपैकी १४ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा ७२ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभाग ९० दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांची सरासरी राखून आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली -
दैनंदिन चाचण्यांची संख्या, प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत १ लाख १० हजार ८४६ रुग्ण आढळले, पैकी ८३ हजार ०९७ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण १७ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता १८ हजारापेक्षाही कमी झाली आहे.