मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विविध टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम विविध भागांचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली आहे. तसेच मनसे आता किंग मेकरच्या भूमिकेत दिसणार का? असा प्रश्न विचारला असता नांदगावकर म्हणाले की, "किंग मेकर कशाला किंग म्हणा, आम्ही किंग आहोत.
संध्याकाळपर्यंत यादी जाहीर होणार -
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी कोर कमिटीच्या सदस्यांसह जवळपास 60 ते 65 पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणत्या प्रभागात निवडणुकीची कशी तयारी करायची याची माहिती राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली. यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम प्रभागात जाऊन अहवाल सादर करतील. कोणत्या टीम कोणत्या विभागात जातील याची यादी संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल.
'किंग मेकर नाही किंग म्हणा' -
बाळा नांदगावकर यांना माध्यमांनी मनसे आता किंग मेकरच्या भूमिकेत दिसणार का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, "किंग मेकर कशाला किंग म्हणा, आम्ही किंग आहोत. आरोप-प्रत्यारोप वर्षानुवर्षे होत आलेत यापुढेही होत राहतील. परंतु लोकांच्या अडचणी आहेत तशाच आहेत."
राज ठाकरेंनी दिले होते तयारीला लागण्याचे आदेश -
या पूर्वी 2 फेब्रुवारीला वरळीतीळ MIG क्रिकेट क्लबमध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. कोणतीही वायफळ चर्चा न करता प्रभाग बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.
युतीवर चर्चा नको-
इतर पक्ष निवडणुकीच्या तयारीला मनसे भाजपसोबत युती करणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. युती होईल की नाही ते पुढे बघू, पण तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही युतीच्या चर्चेत पढू नका. निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा. विधानसभावार कमिटी नेमली जाणार मग ही कमिटी अहवाल तयार करणार आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.