मुंबई- वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा. मनसैनिक काय आहे, हे दाखवून देऊ, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिले आहे. वसईत मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यावर मनसे नेते देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचीही मागणी केली आहे.
परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे कार्यकत्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणांनतर मनसे नेते अधिक आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉनची माघार..; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील खटला मागे
एवढा माज दाखवू नका-
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देणे योग्य नाही. सरकारचे दलाल असल्यासारखे पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जात असतानाही पोलिसांनी पोलिसांसारखे काम केले पाहिजे. तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा..मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते, असे संदीप देशपांडे यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
हेही वाचा-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेचा राडा
त्याच हातांनी सलाम करायला लागेल-
जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला, तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही, ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करत आहोत. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलत, त्याच हातांनी सलाम करायला लागेल, हे पण लक्षात ठेवा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.