मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे. असा वाद गेल्या काही दिवसापासून रंगलेला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केले होते. राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. मनसे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.
आमदार अमोल मिटकरी यांनी राज यांच्या आरोपाला उत्तर दिल्यानंतर मनसे नेत्यांनी देखील मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकीही नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. तसेच यावेळी देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना म्हटले आहे की, 'नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच आहे. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच, असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे.
मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे मनसे सैनिकांच्या चांगले जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज्यात विविध भागातून मनसे सैनिक मिटकरीच्या विरोधात निषेध करताना दिसत आहेत. 'राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे, अशी टीका मिटकरी यांनी रज ठाकरे यांच्यावर केली होती.
काय म्हणाले होते राज ठाकरे-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते आल्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा वाद रंगला आहे.