मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी ईव्हीएमचा मुद्दा हाती घेत भाजपविरोधात उघडलेल्या आघाडीला दहीहंडीतून समर्थन देण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. मुंबईतील एलफिन्स्टन रोड येथे होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे मनसे आयोजक मुनाफ ठाकूर यांनी ईव्हीएमची प्रतिकृती असलेली दहीहंडी बनवली होती. मात्र, पोलिसांनी यावर आक्षेप घेतल्यामुळे ईव्हीएम प्रतिकृती कार्यक्रम स्थळी पोहचू शकली नाही.
ईडीच्या नोटीसीने राज यांच्यासह विरोधकांचा हातात आयते कोलीत
भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांविरोधात सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जात आहे. राजकीय सूडबुद्धीने चौकशांचे शुक्लकाष्ट मागे लावण्याचे भाजपचे धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. हे सर्व थांबायला हवे, असे मतही विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या शांतता राखण्याच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवला नाही. समाजमाध्यमांत मात्र मनसे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते. राज यांच्याविरोधातील वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला जात होता. दरम्यान, मनसेची ईव्हीएम दहीहंडी रोखल्याने मनसैनिक नाराज झाले आहेत.यावर स्वत: राज ठाकरे यांनी योग्यवेळी सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी मुद्दे यानिमित्ताने राज यांच्या हाती आले आहेत.