मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कातच उभारले जाईल असे सांगत महापौर बंगला ताब्यात घेण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांत स्मारकाबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. यावरून मनसेचे संदिप देशपांडे यांनी 'स्मारक की मातोश्री 3' असा खोचक सवाल शिवसेनेला विचारला आहे.
स्मारकासाठी महापौर बंगला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झाले. बाळासाहेबांनी शिवाजी पार्क आपल्या भाषणांनी गाजवले आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानाजवळ उभारले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याची जागा मागण्यात आली. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात 2018 मध्ये महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आला. मात्र अद्यापही या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेले नाही. यावरून संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.
"स्मारक की मातोश्री 3"
राज्यात भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. त्यानंतरही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार की मातोश्री 3 उभे राहणार? असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी ट्विट करत विचारला आहे. दरम्यान यावर आज स्मृतिदिन असल्याने काहीही प्रतिक्रिया देणार नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
हेही वाचा - ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या 'त्या' शब्दाला केराची टोपली दाखवली - प्रवीण दरेकर
हेही वाचा - मुंबईत केंद्रसरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन