मुंबई - मुंबई पालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे प्रसिद्ध आहे. दर पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात ही स्थिती अनेक वर्षापासून कायम आहे. कांजूरमार्ग येथील मनसुख नाका भागामध्ये पालिकेकडून 8 कोटी खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा निघाला. याविरोधात आज मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "बनाना राईड"आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा - भारतात नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - डॉ. अविनाश भोंडवे
.. तर तीव्र आंदोलन करू, मनसेचा इशारा -
काही महिन्यापूर्वी मनसुख नाका येथे महानगरपालिकेच्या वतीने कलवट बनवण्यात आला होता. यासाठी तब्बल साडेआठ कोटीचा निधी वापरण्यात आला होता. मात्र इतका निधी खर्च करून सुद्धा या रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. हे काम केलेल्या ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. 15 दिवसाच्या आत जर यांनी काम सुधारले नाही आणि कारवाई केली नाही तर यापेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार आहोत, असे मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले.