मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात युवा सेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. यावेळी कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. यावरुनच आता मनसे आक्रमक झाली आहे. मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी वरुन सरदेसाई त्यांच्याविरोधात गृह विभागाला पत्र लिहिले आहे. वरुण सरदेसाई यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? त्यांना राज्य सरकारने शासकीय पाहुणा या धर्तीवर सरकारी भाचा घोषित केले आहे का? अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा कोरोनाचे नियमाचे पालन करा, असे सांगत असतात. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते जर या आदेशांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवत असतील, तर इतरांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला उरतो का? असा सवाल अखिल चित्रे यांनी या पत्राद्वारे केला आहे.

मनसेने विचारलेले प्रश्न
- तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितात?
- मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी. पण 'सरकारी भाचा' कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?
- सरकारी आदेशांचे उल्लंघन केले म्हणून वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?
- जनतेने समाज माध्यमांतून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करुनही जर मेळावे होणार असतील, तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये?
- जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार आणि 'मी जबाबदार' असं म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचे खापर फोडणारे सरकार 'सरकारी भाच्या'वर इतकं उदार का? असे विविध प्रश्न मनसेने विचारले आहेत.
हेही वाचा - राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले, म्हणाले 'आता चांगल्या शब्दात टीका करणार'