मुंबई - अॅमेझॉनने त्यांच्या अॅपमध्ये मराठीचा समावेश करावा या मागणीसाठी मनसे अधिक आक्रमक झाली आहे. पुणे आणि मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. याआधी अॅमेझॉनचे पुण्यातील कार्यालय फोडण्यात आले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध अॅमेझॉन हा वाद आता नवीन वळणावर येऊन पोहचला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मनसैनिकांनी आज पुणे आणि मुंबईत अॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाही तर अॅमेझॉन पण नाही’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - पुण्यातील अॅमेझॉन कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरेंना नोटीस
मनसेने अॅमेझॉन विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेनंतर अॅमेझॉनने कायदेशीर पाऊल उचलत कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
अॅमेझॉन या ई कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र, कंपनीने हे शक्य नसल्याचे सांगितल्याने मनसे विरुद्ध अॅमेझॉन अशी लढाई सुरू झाली आहे. मनसेने देखील आक्रमक होत मराठी नाही तर अॅमेझॉन नाही अशी मोहीम सुरू केली आहे.
पुण्यातील अॅमेझॉन कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा अशी मनसेची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सुरुवातीला या मागणीची अॅमेझॉनकडूनही काही प्रमाणात दखल घेण्यात आली होती. मात्र, नंतर कंपनीने मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. याबाबत कंपनीला मनसेने वारंवार आठवण करूनसुद्धा अॅमेझॉनने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. तसेच अॅमेझॉनकडून राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचे उत्तर म्हणून थेट पुण्यातल्या कार्यालयातच खळखट्याक केले आहे. यावेळी घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.