मुंबई - मुंबईतील डीएन नगर पोलीस स्टेशन परिसरात ९ वर्षे ७ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागला आहे. २२ जानेवारी २०१३ रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. ४ ऑगस्ट रोजी तब्बल ९ वर्षांनी हरवलेली मुलगी तिच्या कुटुंबीयांना भेटली. या प्रकरणात पोलिसांनी डिसोझा नामक व्यक्तीला आणि त्याची पत्नी सोनी हिला अटक केली आहे. या कामगिरीत मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांचा हातभार लागला.
हेही वाचा - Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला का नाही-दीपक केसरकर
राजेंद्र धोंडू भोसले हे मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक होते. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यानी 166 मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदवली होती. या मुली २००८ ते २०१५ दरम्यान बेपत्ता झाल्या होत्या. राजेंद्र भोसले आणि त्यांच्या टीमने मुलींच्या शोधात अथक परिश्रम घेतले आणि १६६ पैकी १६५ शोधून काढल्या. परंतु, त्या दरम्यान १६६ व्या मुलीचा सुगावा लागला नाही. भोसले नोकरीच्या काळात दोन वर्षे आणि निवृत्ती नंतरही सात वर्षे या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत राहिले.
स्वतःची मुले नसल्यामुळे मुलीला सोबत नेले - अटक करण्यात आलेल्या डिसोझाची मुंबई पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने मुलीला शाळेजवळ फिरताना पाहिले होते आणि त्याला स्वतःची मुले नसल्यामुळे तिला सोबत नेले. शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी न पोहचल्याने नातेवाइकांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही बाब तत्कालीन सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र धोंडू भोसले यांच्या निदर्शनास आली. यादरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याच्या बातम्या मीडियात फिरू लागल्या आणि स्थानिक लोकांनीही मुलीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली.
मुलगा झाल्यावर मुलीला बेबीसिटर बनवले - आरोपी डिसोझा याने पोलिसांना सांगितले की, या सगळ्याच्या भीतीने त्याने मुलीला कर्नाटकातील रायचूर येथील वसतिगृहात पाठवले. डिसोझा आणि सोनीला 2016 मध्ये मुलगा झाला. अशा स्थितीत त्यांनी मुलीला कर्नाटकातून परत बोलावले. कारण त्यांना दोन मुलांचे संगोपन करणे परवडत नव्हते आणि त्यांनी तिला बेबीसिटर म्हणून काम करण्यास भाग पाडले.
डिसोझा कुटुंब अंधेरी (पश्चिम) च्या त्याच गिल्बर्ट हिल भागातील एका घरात स्थलांतरित झाले, जिथे मुलगी मूळ राहत होती, असे डीएन नगर स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले. डिसोझा कुटुंबीयांना आता खात्री झाली होती की इतक्या दिवसांनी मुलीला कोणी ओळखणार नाही. डिसोझाने मुलीला परिसरात कोणाशीही बोलू दिले नाही. या प्रकरणी पोलिसांनी डिसोझा आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध अपहरण, मानवी तस्करी, चुकीच्या पद्धतीने कोठडीत घेणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Dipak kesarkar : औरंगजेब क्रूर राजा, दिपक केसरकर यांच्याकडून अबू आझमींना प्रत्युत्तर