मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात आली होती. या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
एप्रिल 2020 पासून प्रतिदिन अतिरिक्त होणाऱ्या दुधापैकी 10 लक्ष लिटर दुधाची स्विकृती करुन सदर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना कार्यान्वीत केली. प्रथमत: ही योजना एप्रिल व मे या 2 महिन्यांसाठी राबवण्यात आली. तदनंतर या योजनेस 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तथापी राज्यातील अतिरिक्त दुग्ध परिस्थिती अद्यापही अपेक्षेइतकी सुधारणा झालेली नसल्याने 8 जुलै रोजीच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत सदर योजनेस १ महिन्याने मुदतवाढ देण्यात आली.
या 1 महिन्याच्या वाढीव मुदतीत सरासरी प्रतिदिन 5.14 लक्ष लिटर या प्रमाणे 1.60 कोटी लिटर दूध स्वीकृती केली जाणार असून त्यासाठी 51.22 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्विकृत केले जाणार असून त्यापोटी 190 कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे. केंद्राने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन घेाषित केला होता. राज्यानेही 19 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊनमध्ये बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण 17 लक्ष लिटरने कमी झाली आहे.