मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये राज्यपाल नियुक्त ( University Appointments ) अधिसभा सदस्यांमध्ये अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भरणा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधक कशासाठी विद्यापीठ सुधारणा विधेयकाला ( Oppose to University Reform Bill ) विरोध करीत होते, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी केला आहे. खजिन्याच्या चाव्या चोरांच्या हातात असल्यानंतर काय होते, हे मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, असा गौप्यस्फोट करीत विद्यापीठांमधून नेमलेल्या अधिसभा सदस्यांमध्ये ( Appointment of Members of the Senate ) भाजपा आणि संघाच्या प्रचारकांचा कसा भरणा होता, याची यादीच यशोमती ठाकूर यांनी उघड केली आहे.
... म्हणूनचं विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध -
राज्य सरकारने विधिमंडळामध्ये नुकतेच विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडले आणि मंजूर करून घेतले. या विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार आता राज्य सरकारने समान संधी मंडळाची निर्मिती केली आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये अधिसभा सदस्य नियुक्ती करताना समाजातल्या प्रत्येक स्तराला वाव मिळणार आहे. समाजातील विचारवंत, बुद्धिवंत यांचा समावेश केला जाणार आहे. मात्र या विधेयकाला भाजपाने कडाडून विरोध केला. तसेच राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू होणार, विद्यापीठे आता राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणि मनमानीचा अड्डा बनणार,अशा पद्धतीची जहरी टीका आणि प्रखर विरोध केला. वास्तविक भाजपाने आपल्याच कार्यकाळात अधिसभा सदस्य नियुक्तीमध्ये ( University Appointments Dispute ) कसा मनमानी कारभार केला होता आणि कसे अड्डे तयार केले होते. शिक्षणाच्या बाजारीकरणाची कशी व्यवस्था निर्माण केली होती, याचा पुरावाच आम्ही तुम्हाला देत आहोत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
भाजपाची चालाखी उघड -
ट्विटच्या माध्यमातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ( Sant Gadagebaba Amravati University ) नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपाल तथा कुलगुरू नियुक्त अधिसभा सदस्यांची यादी त्यांनी समोर आणली आहे. यादीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भाजपाचे पदाधिकारी यांचा भरणा दिसतो आहे. दहापैकी नऊ सदस्य हे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत. हे केवळ अमरावती विद्यापीठातच घडले आहे असे नाही तर राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील हीच परिस्थिती आहे. अधिसभा सदस्यांमध्ये एखादा दुसरा सदस्य वगळता उरलेले सर्व सदस्य हे अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि भाजपा पदाधिकारी आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने भाजपाचा मनमानी कारभार सुरू होता याचा पर्दाफाश केल्याचे अँड.ठाकूर यांनी म्हटले आहे.