मुंबई - दादर येथील इंदूमिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ( Dr Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial ) आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत आहे. हे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. या सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी व्यक्त केले. दादर येथील इंदूमिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.
'काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार' - धनंजय मुंडे म्हणाले की, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर १५ दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्चितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्यायविभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एमएमआरडीएकडे असले तरी राज्य सरकारने इंदूमिल स्मारक उभारणीच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तात्काळ एमएमआरडीएला वितरण करण्याचे निर्देश ही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.
स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने पूर्ण करणे यासाठी एक उपसमिती नेमली आहे. या उपसमितीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि माझा समावेश आहे. या स्मारकाचे काम जलदतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी आढावा घेणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.
यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. प्रवेशव्दार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एमएमआरडीए हे सर्व काम गतीने करत आहेत. उर्वरीत काम गतीने करणार असल्याची माहिती श्रीनिवासन यांनी बैठकीत दिली आहे.