मुंबई - मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि एफडीएने संयुक्तपणे छापा टाकून अंधेरीच्या सहार गाव परिसरात बनावट दुधाचा काळा धंदा करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत शेकडो लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, ही टोळी सुप्रसिद्ध दूध कंपन्यांच्या पिशव्यांमधून भेसळयुक्त दूध विकत होती. ते दूध प्यायल्याने लोकांचे आरोग्यही बिघडू शकते. या कारवाई दरम्यान 325 लिटर नकली दूध जप्त करण्यात आले.
असा चालायचा भेसळीचा धंदा-
भेसळ दूध विक्री करणारी ही टोळी आधी ब्रँडेड कंपन्यांची दुधाची पाकिटे विकत घ्यायची आणि नंतर ती हलकी कापून अर्धे दूध बाहेर काढायचे आणि त्यात पाणी भरायचे. पाणी मिक्स केल्यानंतर तो पॅकेटला मेणबत्ती किंवा स्टोव्ह पिनच्या मदतीने चिकटवायचे. ती पिशवी अशा प्रकारे चिकटवायची की ग्राहकाच्याही ते लक्षात येत नसे. ही टोळी गेली एक वर्ष हा व्यवसाय चालवत होती. सध्या, गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे.