मुंबई - विक्रोळी कन्नमवार नगर म्हाडा इमारतीतील 43 क्रमांकाच्या बंद असलेल्या आणि धोकादायक वर्ग केलेल्या एका 3 मजली इमारतीचा काही भाग आज सांयकाळी कोसळला. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल दाखल झाले असून त्यांनी या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती दिली.
विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये म्हाडाच्या रहिवासी इमारती आहेत. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील बंद असलेल्या 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी बाजूच्या लगत असलेल्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. ही इमारत म्हाडाने 1966 ला निर्माण केली होती. म्हाडा आणि इमारत सुरक्षा मंडळाने या इमारतीला २०१८ ला धोकादायक इमारत म्हणून वर्ग केले. यातील काही रहिवाशी गेले ६ वर्ष झाले बाहेर भाड्याने राहत आहेत,असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. ही इमारत खाली केली असल्याने या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नव्हते .त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
इमारतीच्या शेजारील रहिवाशांचे मागणी आहे, की म्हाडा बोर्डाने लवकरात लवकर, अशा धोकादायक इमारतींना तोडून इतर इमारतींना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेऊन भविष्यात होणारी हानी टाळावी .या इमारतीला धोकादायक ठरवून आम्हाला बाहेर काढले गेले पण आम्हाला ना भाडे दिले जाते ना इमारत उभी केली जाते. ४ वर्ष झाले इमारत उभी केली जात असल्याचे सांगितले जाते, अशी माहिती पूर्वी या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी दिली.