मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा शक्य तितके ऑनलाइन काम करण्याकडे वळत आहेत. त्यानुसार म्हाडानेही कारभार ऑनलाइन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाची अनेक कामे महिन्याभरात ऑनलाइन सुरू होणार आहेत.
ऑनलाईन कामे करण्यासाठी म्हाडाचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या संकटात विकासक असो वा सामान्य नागरिक त्यांना म्हाडा कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी राधाकृष्णन यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
टाळेबंदीच्या काळात म्हाडाचे कार्यालय बंद होते. टाळेबंदी खुली होताना म्हाडा कार्यालयात अधिकारी-कर्मचारी कामासाठी येत आहेत. पण, त्याचवेळी कोरोनाचा धोका लक्षात घेता म्हाडात नागरिकांना अद्याप प्रवेश बंद आहे. जर, खूपच महत्वाचे काम असेल तर विशेष परवानगीने म्हाडात प्रवेश दिला जात आहे. कार्यालयातील कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाचा एकही प्रस्ताव गेल्या काही महिनाभरात आलेला नाही. तर म्हाडा रहिवाशांचीही अनेक कामे रखडली आहेत.
ही सर्व परिस्थिती आणि कोरोनाचा धोका पाहता म्हाडाच्या मुंबई मंडळाने सर्व कारभार ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्याचे राधाकृष्णन यांनी दिली आहे. 33 (5) म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या परवानगीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. तर म्हाडाच्या सोडतीमधील विजेत्यांपासून म्हाडा रहिवाशांची सर्व कामे ऑनलाईन होणार आहेत. भाडे भरणे असो वा इतर कुठल्या परवानग्यांसाठी म्हाडात येण्याची गरज कुणालाही लागणार नाही, असेही राधाकृष्णन यांनी सांगितले आहे.
काय आहे म्हाडा?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही राज्याची सरकारी संस्था आहे. राज्यांती शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना वाजवी दरात घरांची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे.