मुंबई - मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी म्हाडाने एक निर्णय घेतलेला आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या स्थलांतराचा विषय महत्त्वाचा असतो. रहिवासी लांब ठिकाणी जाण्यास नकार देतात. यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या मुंबईतील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरूंकरिता दक्षिण मुंबईतच पर्यायी निवासाकरिता १७७ गाळे उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यांतर्गत ४७ भाडेकरूना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती, मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले.
तिथल्या तिथेच स्थलांतर
दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतील भाडेकरूंना इमारत खाली करण्यास सांगितल्यावर लांब ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यास नकार दर्शवतात. मात्र जीवितहानी टाळण्यासाठी या भाडेकरूंना तिथल्या तिथेच स्थलांतर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या परिस्थितीचा विचार करता आणि कोणत्याही अपघातामुळे जीवित व वित्तहानी टाळता यावी, याकरिता मंडळाने पुनर्रचित इमारतींतील गाळे धोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाशांकरिता उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. दक्षिण मुंबईतील माजगाव, ताडदेव, दादर, खेतवाडी, वरळी, न्यू हिंद मिल, इस्त्राइल मोहल्ला अशा अनेक ठिकाणी हे गाळे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकता भासल्यास मुंबई मंडळाकडे मागणी नसलेल्या लहान आकाराच्या सदनिका संक्रमण शिबिर गाळा म्हणून वर्ग करण्याबाबतदेखील कार्यवाही करण्यात येईल, घोसाळकर यांनी सांगितले.
२१ इमारती अतिधोकादायक
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या वर्षी २१ इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक २१ इमारतींमध्ये पहिल्या टप्प्यांतर्गत ४७ भाडेकरूना यासंक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित १७७ निवासी भाडेकरू रहिवाशांना आवश्यकतेनुसार त्यांना गाळे उपलब्ध करवून देण्यात येतील, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली.